सोमवार, २० एप्रिल, २०१५

अक्षय तृतीयाचे महत्व ।

21 तारखेला  अक्षय तृतीय आहे म्हणून मी लेख पाठविला  आहे
अक्षय्य तृतीया महात्म्य

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया ,

अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे ?

या दिवशी वर दिलेल्या तीन्ही जयंत्या एकत्र येतात, त्यावेळी व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन 'ममाखिलपापक्षयपूर्वक सकल-शुभ फलप्राप्तये भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये' असा संकल्प सोडून परमेश्वराची षोडशोपचारे पूजा करावी. पंचामृतस्नान घालून त्यास सुवासिक फ़ुलांचा हार घालावा.
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जव गहु ,हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ ( गन्धॊदकतिलैमिश्रं सान्नं कुंभं फलाचितम् ) घर्मघट, धान्यपदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे ?

हा सनातनी धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप , होम, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे ?

या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. ( मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll

२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

विशेष सूचना = ( या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते )

वरील लेख आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. व हि माहिती आपल्या सर्व मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती !

" भाग्यलिखित परिवारातील प्रत्येकाला अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी नांदो... !!! "

धन्यवाद !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा